हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार पूरग्रस्तांच्या मदत कार्यात अग्रेसर….

हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील काही गावात वारणा व पंचगंगा नदीच्या पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. वारणा नदीच्या काठावर असलेली निलेवाडी, जुने पारगाव, जुने चावरे, घुणकी, भेंडवडे, खोची तर पंचगंगा नदीच्या काठावर असलेले शिरोली (पु), हालोंडी, रूकडी, चंदूर, रुई, इंगळी अशी गावे हातकणंगले विधानसभा मतदारसंघात येतात. कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस व पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. नदी काठावरील गावांत पूर परिस्थिती गंभीर बनली आहे.
या परिस्थितीत विधानसभा निवडणुकीचे पडघम कधीही वाजू शकतात.

हातकणंगले विधानसभा मतदारसंघ राखीव आहे. या मतदारसंघातील आजी माजी आमदार पुरग्रस्‍तांच्या मदतीसाठी पुढे येताना दिसत आहेत. या गावांच्या मदतीसाठी आगामी विधानसभा निवडणुकीतील इच्छुक उमेदवार मदतकार्यासाठी पुढे सरसावले आहेत. तसेच इतर संघटनांचेही इच्छुक उमेदवार मदतकार्यासाठी पुढे येत आहेत. हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार राजूबाबा आवळे हे स्वतः या गावांना भेटी देत पुरग्रस्तांच्या समस्या जाणून घेऊन प्रशासनाला सूचना केल्या आहेत.

माजी आमदार व गोकुळ दूध संघाचे संचालक सुजित मिणचेकर हे या नदीकाठच्या गावांना भेटी देताना दिसतात. तर माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव मानेही या गावांना भेटी देत आहेत. मदतकार्याचे व्हिडिओ व फोटो थेट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. राज्यातील महायुती व महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रित राहून निवडणूक लढवणार का ? नाराज उमेदवार पक्षाशी एकनिष्ठ राहणार का? यावरही अनेकांची समीकरणे अवलंबून आहेत. पण सद्यस्थितीत दिसत आहेत.