सांगलीत पाणीपातळीत चढ-उतार सुरूच

सांगली जिल्ह्यात आज पावसाने तुरळक, तर काही ठिकाणी दमदार हजेरी लावली. कोयना धरणातून कालपासून 52 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होईल, असा अंदाज होता. पण, काल रात्रीपासून पाणीपातळी 39 फुटावर स्थिर आहे. मात्र, सकाळपासून सांगलीत कृष्णा नदीची पुन्हा 40 फुटांच्या इशारा पातळीकडे वाटचाल सुरू होती. त्यामुळे शहरातील मगरमच्छ कॉलनीत पाणी घुसल्याने नागरिकांचे स्थलांतर केले आहे.

कृष्णा नदीची पाणीपातळी काल रात्रीपासून संथ गतीने वाढत आहे, तर आज दिवसभरात ती 39 फुटांवर स्थिर आहे. कृष्णा नदीच्या पाणीपातळीत सातत्याने चढउतार होत असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. सांगलीत इशारा पातळी 40 फूट, तर धोका पातळी 45 फुटांवर आहे. कृष्णा नदीने पुन्हा इशारा पातळी गाठल्याने कृष्णाकाठ धास्तावला आहे.