लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत निर्माण झालेला तिढा सोमवारी दिल्लीत सुटणार असल्याची माहिती काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांनी बोलताना दिली.त्यानंतर मंगळवारी गुढीपाडव्याच्या दिवशी महाविकास आघाडीच्या जागावाटपाची घोषणा होणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.
मविआची जागा वाटपाची बोलणी सुरू असताना उद्धवसेनेने सांगली मतदारसंघात चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली. परस्पर उमेदवार जाहीर केल्याने राज्यातील काँग्रेस नेत्यांनी उद्धव सेनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या जागेबाबत राज्यातील काँग्रेस नेत्यांनी उद्धवसेनेशी बोलणीही थांबवली. याबद्दल निर्णय घेण्याची विनंती दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना केली होती.
सांगलीतील काँग्रेस आमदार दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींनाही भेटून आले. उद्धवसेनेकडून संजय राऊत दिल्लीतील काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात होते. सोमवारी सांगलीच्या जागेचा तिढा सुटेल, असे काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
गुढीपाडव्याला ४८ जागांच्या वाटपाची अधिकृत घोषणा मंगळवारी करणार आहे. यासाठी उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद हाेईल.