लोकसभा निवडणुकीत महायुतीला पराभवाला सामोरे जावे लागल्याने कार्यकर्त्यात नाराजी दिसत आहे.सांगोला तालुक्यात इच्छुक नेतेमंडळी लोकसभेला झालेल्या मतांची गोळा बेरीज, आकडेमोड करीत विधानसभेच्या तयारीला लागले आहेत.
शिवसेनेचे विद्यमान आमदार शहाजी पाटील विधानसभेला यावेळी फिक्सच असे म्हणत कामाला लागले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपकआबा साळुंखे पाटील हे देखील सांगोला तालुक्यातील अनेक गावागावात गाव भेट जनसंवाद दौरा करत आहेत. जनतेशी संवाद साधत आहेत.
तर महाविकास आघाडीतील शेतकरी कामगार पक्षातीलच डॉ. बाबासाहेब देशमुख व डॉ. अनिकेत देशमुख या बंधूमध्ये तिकिटासाठी रस्सीखेच सुरु आहे.गेल्यावेळी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांना ऐनवेळी राष्ट्रवादीच्या दीपक साळुंखे पाटील यांनी सहकार्य केले होते.
राज्यातील पक्षीय आघाडी बाजूला सारून आबा-बापू एकत्र आले होते. या निवडणुकीत शेकापचा बालेकिल्ला असलेला तालुक्यात शिवसेनेचा धनुष्यबाणाने इतिहास घडविला होता. सध्या राजकीय परिस्थितीही वेगळी आहे.राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांना कार्यकर्ते विधानसभा निवडणूक लढविण्याची साद घालत आहेत.आता माघार घ्यायची नाही असे सारखे दिपक आबांना बोलत आहेत.
पुढील काही काळात दिपकआबा विधानसभेची निवडणूक लढविणार का हे निश्चितच होईल. यामुळे ‘आबा’ की ‘बापू’ यांची चर्चा सुरू झाली आहे.