रंकाळा येथील श्री साईदर्शन जनता अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीत घुसून मनसेचे शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले, पदाधिकारी प्रसाद पाटील यांच्यासह समर्थ कशाळकर आणि विकास कांबळे यांनी तिघांना जातीवाचक शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. दुपारी घडलेल्या प्रकारानंतर सोसायटीचे प्रमुख शुभम कृष्णात देशमुख यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी चारही संशयितांवर खंडणी, दरोडा आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केले.
लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंकाळा येथील क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून शुभम देशमुख आणि त्यांच्या सहका-यांनी कर्ज देण्याची जाहिरात करून गरजूंकडून पैसे घेतले. याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेले राजू दिंडोर्ले आणि इतरांनी फिर्यादी देशमुख यांच्यासह सोसायटीचे अध्यक्ष सचिन साबळे आणि उपाध्यक्ष सुरेश पाटील यांना बेदम मारहाण केली. कार्यालयाची तोडफोड करीत जातीवाचक शिवीगाळ केली.
तसेच कर्जाचे आमिष दाखवून काही लोकांकडून पैसे घेतल्याचे जबरदस्तीने लिहून घेतले. सीसीटीव्ही कॅमे-यांचा डीव्हीआर काढून लंपास केला. सोसायटीच्या पदाधिका-यांसह कर्मचा-यांना कार्यालयात कोंडून मारहाण सुरू असल्याचा प्रकार समजताच लक्ष्मीपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन देशमुख यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी मध्यरात्रीच दिंडोर्ले याच्यासह चौघांना अटक केली. त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह दरोडा, दमदाटी, मारहाण, खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला.
दिंडोर्ले याला अटक झाल्याचे समजताच त्याच्या समर्थकांनी मंगळवारी दुपारी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याबाहेर गर्दी केली. पोलिसांनी गर्दी हटवून चौघांना न्यायालयात हजर केले. दिंडोर्ले याने गेल्याच आठवड्यात पाकिटबंद खाद्य पदार्थांच्या दर्जावरून डी मार्टमध्ये गोंधळ घातला होता. याबाबत त्याच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.