विजयी गुलाल लागला! बिद्रीच्या फडात मुश्रीफ-बंटी पाटलांची निर्णायक साथ!

कोल्हापूरच्या बिद्री साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच पार पडली. बिद्री साखर कारखान्याच्या रणांगणात बाजी मारल्यानंतर आज (6 डिसेंबर) कारखान्याचे चेअरमन माजी आमदार के. पी. पाटील यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री तथा आघाडीतील नेते हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विजयाप्रती कृतज्ञता व्यक्त करत पाया पडले. यावेळी मुश्रीफ यांनी त्यांना पटकन वर करत गळाभेट घेतली. के. पी. पाटील यांच्यासाठी बिद्री निवडणूक अस्तित्वाची ठरली होती. बिद्रीच्या निवडणुकीत हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी के. पी. पाटील यांना समर्थ साथ दिली होती. निकालावर प्रतिक्रिया देताना हसन मुश्रीफ म्हणाले की, बिद्रीने सभासदांना आत्तापर्यंत विक्रमी दर दिला आहे. के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली चांगला कारभार सुरू असल्याने यंदाही सभासदांनी त्यांना स्वीकारले आहे. आगामी काळातही चांगला कारभार होईल. 

सत्ताधारी आघाडीकडून आबिटकर-मंडलिक-घाटगे गटाचा सपशेल धुव्वा!

दरम्यान, दोन खासदार, दोन कॅबिनेट मंत्री, दोन आमदार, पाच माजी आमदार आणि गोकुळ अध्यक्ष अशी तगडी फौज उतरल्यामुळे प्रचंड ईर्षा निर्माण झालेल्या बिद्रीच्या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीने पुन्हा बाजी मारली आहे. श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीने 25 पैकी 25 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली. विरोधी राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीचा सुमारे साडे पाच हजारांहून अधिक मताधिक्क्यांनी पराभव केला.