नावाप्रमाणेच राजेशाही थाट निभावणाऱ्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह वास्तूची बांधणी स्वतः छत्रपती शाहू महाराजांच्या पुढाकारानेच झाली.या वास्तूत संगीत, नाट्य कलेची बीजेदेखील रुजली गेली. आज अचानक लागलेल्या आगीने कोल्हापूरची अस्मिता आगीच्या खाईत लोटलेली पाहणे दुर्दैवी आहे.
पण या वास्तूच्या पुन:उभारणीसाठी तात्काळ १० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. घटनास्थळी राजेश क्षीरसागर यांनी तातडीने धाव घेत आवश्यक सूचना उपस्थित जिल्हाधिकारी अमोल येडगे, आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्यासह प्रशासनास दिल्या.
दरम्यान, क्षीरसागर यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी तात्काळ टर्न टेबल लॅडर, विमानतळ प्रशासनाचे अग्निशमन वाहन पाचारण केले.या संपूर्ण घटनेची माहिती क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळविली. संपूर्ण घटनाक्रमात राजेश क्षीरसागर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती देत होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी १० कोटींचा निधी जाहीर केला असल्याची माहितीही क्षीरसागर यांनी दिली.