राज्यातील २३५९ ग्रामपंचायतीमध्ये आज मतदान होत आहे. या मतदान प्रक्रियेआधी नाशिकमध्ये निवडणुकीला गालबोट लागलं आहे. नाशिकामधील इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत उमेदवाराच्या पतीवर रात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.
इगतपुरी तालुक्यातील धारगाव येथील ही घटना आहे. रंजन गोर्धने असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. शनिवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास रंजन हे रस्तात उभे असताना अचानक टोळक्याने त्यांच्या हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.
अमरावतीत दोन गटात बाचाबाची
अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील कारला येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदान केंद्रावर दोन गटात बाचाबाची पाहायला मिळाली. मतदान केंद्राच्या कक्षामध्ये उमेदवारांच्या प्रतिनिधींवरून हा वाद झाला.
अखेर पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढले. या घटनेनंतर मतदान केंद्राबाहेर नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना 100 मीटरच्या आतमध्ये येण्यास मज्जाव केला आहे.
कोल्हापुरातही गोंधळ
कोल्हापूर जिल्ह्यातही 89 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक तर 12 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका आज पार पाडत आहेत. कोल्हापुरातील चिंचवाड मतदान केंद्राबाहेर राडा झाल्याची घटना समोर आली आहे. मतदारांवर दबाव टाकल्याचा आरोप करत एका गटाने राडा घातला. त्यानंतर दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली.