राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. अचानक झालेल्या या भेटीने चर्चांना उधाण आलं आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची जवळीक वाढू लागल्याने या भेटीकडे राजकीय दृष्टीकोणातून पाहिले जात आहे. एकनाथ शिंदे आणि मनसेकडून ही केवळ औपचारिक भेट होती. राज यांनी भोजनासाठी बोलावलं होतं म्हणून आलो होतो. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं म्हटलं आहे. मात्र, या भेटीवर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. काल ते (शिंदे) आमरस पुरी खायला गेले होते, कॅफे होता ना तो, काल आमरस पुरीचा बेत होता, असा चिमटा संजय राऊत यांनी काढला आहे. काल उपवासाचा दिवस असल्यामुळे ते असे बाहेर उपवास करतात. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गट आणि मनसे यांची युती होण्याची चर्चा आहे. ती युती झाली की मग आपण बोलूया, तो निर्णय देवेंद्र फडणवीस घेतील, तसंच होईल, शिंदेंच्या हातात काहीच नाही, असा टोलाही राऊतांनी लगावला.
आठवले त्यांचा पक्ष चालवतात
अमित शाह हेच एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे पक्षप्रमुख आहेत. अमित शाह राज्यातील तीन पक्षांचे प्रमुख आहेत. हा मोठा विक्रम आहे. अधूनमधून रामदास आठवले यांचा पक्ष चालवतात, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
बाळासाहेब द्रष्टे होते
यावेळी राऊत यांनी भाजपला डिवचलं आहे. कमळाबाई या शब्दावरून त्यांनी भाजपला चांगलेच टोले लगावले आहेत. तसेच कमळाबाईचा अर्थ काय हे सुद्धा राऊत यांनी सांगितलं आहे. कमळाबाई हे नाव बाळासाहेब ठाकरे यांनी ठेवलं होतं. त्यांचं बारसं हे बाळासाहेबांनी केलंय. बाळासाहेब द्रष्टे होते, त्यांनी जाहीर सभेत हे नाव ठेवले, असं राऊत म्हणाले.
पवारांचे झाला नाहीत, आमचे काय होणार?
यावेळी त्यांनी उदय सामंत यांच्यावरही टीकास्त्र सोडले. शिवसेनेत कधी आला हे उदय सामंत यांना विचारा. किती पक्ष बदलून आले होते तेही विचारा. व्यापारी आहात, पैसे कमवायला गेला. उद्योगमंत्री आहात. तुम्ही शरद पवारांचे झाला नाहीत, आमचे काय होणार? उद्योजक राजकारण्याने बाळासाहेब ठाकरे यांच्यावर बोलू नये, अशा शब्दात त्यांनी सामंत यांना फटकारले.