इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून अधिकाधिक जास्त अधिक इच्छुक आहेत. महाविकास आघाडीत देखील उमेदवारीवरून रस्सीखेच निर्माण झाली आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात महायुतीत गुंता अधिकच वाढत आहे. यातच अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत इचलकरंजीतून पुत्र डॉ. राहुल आवाडे यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. राहुल आवाडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यनंतर विरोधक आणि भाजप समर्थकांनी बैठक घेत प्रसंगी माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना मदत करण्याचा गुप्त ‘प्लॅन’ आखला आहे. त्याबाबतची बैठक मध्यरात्री झाल्याचे समजते.
रात्री उशिरा झालेल्या एका बैठकीत विरोधकांकडून एकास एक उमेदवार देण्यासह एका माजी नगराध्यक्षांच्या नावावर एकमत करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. तर, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांना सहकार्य करण्यावरही चर्चा झाल्याची माहिती आहे. अशातच अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी पुत्र राहुल आवाडे यांच्या उमेदवारीची घोषणा केल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीमधील दुसऱ्या फळीतील नेत्यांनी एकत्र येत रात्री ‘गुप्त’ बैठक घेतली आहे. आवाडे यांचे विरोधक एकत्र येत राहुल आवाडे यांच्या पराभवासाठी ‘प्लॅन’ आखले जात आहेत.
या ‘गुप्त’ बैठकीत काही भाजपमधील जबाबदार दोन नेते आणि एका नवीन स्थापन झालेल्या एका आघाडी प्रमुखांची उपस्थिती होती. तर, महाविकास आघाडीतील मुंबईतील मोठा पक्ष असणाऱ्या नेत्याच्या संपर्कात असणारा ‘दादा’ या बैठकीत आघाडीवर होता. जर, महायुतीकडून राहुल आवाडे यांना उमेदवारी निश्चित झाल्यास एकास-एक उमेदवार देण्याची चर्चा झाली. प्रसंगी भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना पाठिंबा देण्याची चर्चाही यामध्ये करण्यात आली.
तसेच तीन संभाव्य नावांवर प्राथमिक चर्चा करण्यात आली. दरम्यान, रात्री उशिरा झालेल्या या बैठकीमुळे विधानसभा मतदारसंघातील मोठे पदाधिकारी राजकीय षडयंत्र रचण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येते. त्यांच्या या हालचालींमुळे इचलकरंजीतील राजकारणात मोठ्या घडामोडीचे संकेत मिळत आहेत.