आघाडी-युतीत जागावाटपाचा फाॅर्म्युला ठरला; पण उमेदवारीचा पेच अन् बंडखोरीची भीती…

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील दहा मतदारसंघातील जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास दोन्ही आघाडीमध्ये निश्चित झाला आहे. महायुतीमधील सहा मतदारसंघातील उमेदवार जवळपास निश्चित झाले असून महाविकास आघाडीमध्ये चार विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून घोडं अडलं आहे.तर महायुतीमध्ये चार मतदारसंघांमध्ये बंडखोर बंडाचे निशाण फडकवण्याची भीती आहे. महाविकास आघाडीत कोल्हापूर उत्तर, राधानगरी, चंदगड, शिरोळ या मतदारसंघात उमेदवार कोण असावा? याबाबत अनिश्चितता आहे.

या मतदारसंघात उमेदवारीचा पेच निर्माण झाला असून महायुतीला शिरोळ, चंदगड आणि करवीर विधानसभा मतदारसंघात बंडखोरांची भीती आहे.महाविकास आघाडीमधील जवळपास सात जागांवरील संभाव्य लढत निश्चित झाली आहे. शाहूवाडी, कागल, करवीर, कोल्हापूर दक्षिण, हातकणंगले, इचलकरंजी या मतदारसंघात संभाव्य उमेदवार निश्चित झाले आहेत. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसला जाण्याची शक्यता आहे. या मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाने दावा केला आहे. विद्यमान आमदार काँग्रेसचा असल्याने ही जागा काँग्रेसला जाण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेसकडे तुल्यबल उमेदवार या मतदारसंघात नाही. त्यामुळे काँग्रेस या मतदारसंघातून नवा चेहरा देणार की मतदारसंघ ठाकरे गटाला सोडणार? याबाबत अजून निश्चितता नाही.