आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आता सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. मनोज जरांगे यांनीही उमेदवार देणार असल्याचं म्हटलं आहे. मनोज जरांगे यांची भाजपच्या काही नेत्यांनी भेट घेत त्यांच्याकडे तिकीटाची मागणी केली आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी कोण आहेत ते नेते ज्यांनी जरांगे यांची भेट घेतली आहे. काही दिवसांआधीच मिनल खतगावकरांनी जरांगेंची भेट घेतली. आता भाजपचे बीडचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के आणि केजच्या माजी आमदार संगिता ठोंबरेंनी तर जरांगेंची भेट घेत थेट तिकीटाचीच मागणी केली. म्हणजेच भाजपचे नेते सध्या जरांगेंकडे उमेदवारीसाठी येत आहेत.उमेदवारी देताना माझा विचार करा, शब्द फिरवणार नाही, असं संगिता ठोंबरे म्हणाल्यात.
तर उमेदवारीसाठी भाजपच्या नेत्यांची लिस्ट असून तात्काळ आरक्षणाचा मार्ग मोकळा करा, नाही तर पाडणारच असा इशारा जरांगेंनी फडणवीसांना दिलाय. भाजप नेत्या संगिता ठोंबरेंच्याआधी बीडचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्केंनीही जरांगेंटची भेट घेतली. पण त्यांनी जरांगेंकडील उमेदवारीवर थेटपणे बोलणं टाळलं. त्याचवेळी सुरुवातीपासूनच आपण जरांगेंच्या आंदोलनात असल्याचं म्हटलंय.मनोज जरांगेंकडून सध्या इच्छुकांच्या भेटीगाठी सुरु आहेत.
भाजपमधलेही मराठे आता अन्याय बघू शकत नाही, असं वक्तव्य करुन जरांगेंनी भाजपच्या गोटात खळबळ उडवलीय. 29 तारखेला जरांगे निवडणुकीसंदर्भात भूमिका स्पष्ट करणार आहेत. निवडणूक लढणार की सत्ताधाऱ्यांचे आमदार पाडणार, हे 29 तारखेला जरांगे ठरवतील. पण त्याआधी भाजपचे नेतेच जरांगेकडे उमेदवारीसाठी भेटीगाठी घेत आहेत.