वाढवण बंदराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त ठरला? पंतप्रधान मोदींच्या हस्ते कामाचा श्रीगणेशा होण्याची शक्यता…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वकांक्षी वाढवण बंदर प्रकल्प या प्रकल्पाचे भूमिपूजन 30 ऑगस्ट रोजी होणार असल्याचे सांगितले जाते. त्यादृष्टीने हालचालींना वेग आला आहे. मात्र, या बंदराला स्थानिकांचा मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून किनारपट्टीवरील स्थानिक या बंदराला विरोध करत आहेत. येत्या 30 ऑगस्ट ला वाढवण बंदराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे स्थानिक विविध संघटनांनी या सोहळ्याला विरोध दर्शवला असून चक्काजाम आंदोलन , जेल  भरो आंदोलन करणार असल्याचे सांगितले जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याला काळे झेंडे सुद्धा दाखवणार असल्याचे युवा संघर्ष समितीचे सचिव मिलिंद राऊत यांनी सांगितले आहे.

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात वाढवण येथे समुद्रात हे बंदर उभारले जाणार असून या बंदरासाठी तब्बल 76 हजार 200 कोटी इतका निधी मंजूर झाला असून केंद्र सरकारने पहिल्याच कॅबिनेट बैठकीमध्ये वाढवण बंदराला मंजुरी दिली होती. तर राज्य मंत्रिमंडळाची सुद्धा या बंदराला मंजुरी मिळाली असल्याने बंदराच्या हालचालीला वेग आलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे वाढवण बंदराचा संघर्ष हा अधिकच चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे . तर सध्या जेएनपीटीचे कार्यालय आणि इतर गोष्टींसाठी काही शासकीय जागा आरक्षित करण्याच्या हालचालींना सुद्धा वेग आला आहे.