एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या राजकारणातील कर्ण, देवेंद्र फडणवीस अर्जुन, शरद पवार हे…

विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार आणि महायुतीचा मित्रपक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत केलेले एक वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या  राजकारणातील कर्ण आणि देवेंद्र फडणवीस हे अर्जून असल्याचे म्हटले आहे. तर शरद पवार हे शकुनी मामा असल्याचा दावा सदाभाऊ खोत यांनी केला आहे. ते रविवारी भाजप नेते सम्राट महाडिक यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी सांगलीमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

महाराष्ट्राच्या राजकारणातील कर्ण हे एकनाथ शिंदे तर अर्जुनाची भूमिका देवेंद्र फडणवीस बजावत आहेत. मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी मिळवून दिलेले पहिले आरक्षण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी घालवले, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला. मराठा समाजाचे आतापर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले. पण यापैकी कोणत्याही मुख्यमंत्र्याने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही.  पण 2019 साली मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी पहिले आरक्षण मिळवून दिले. पण शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला मिळालेले हे आरक्षण घालवले. मात्र, या दोघांवर टीका झाली नाही.

एकनाथ शिंदे नावाच्या वाघाने बंड केले आणि देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने मविआचे सरकार पाडून महायुतीचे पुन्हा सरकार आणले. राज्य कसे चालवावे याचा दुरदृष्टीपणा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे.  मात्र, देवेंद्र फडणवीस यांना सर्वांनी घेरले आहे. कारण  फडणवीसच आपल्याला फाइट देऊ शकतात हे शरद पवारांना कळले आहे. त्यामुळे वेगवेगळी आंदोलने आतापर्यंत राज्यात उभी करण्यात आल्याचा दावा सदाभाऊ खोत यांनी केला.