शक्तिपीठविरोधी मुख्यमंत्र्यांसमोर निदर्शने करण्याचा निर्धार…

शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिस बळाचा वापर सुरू आहे. शासन पोलिसांच्या दंडूकशाहीने हे आंदोलन मोडून काढण्याच्या प्रयत्नात आहे, असा आरोप शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीने केला. याबाबतचे निवेदन समितीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना दिले. गुरुवारी शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समिती मुख्यमंत्र्यांसमोर निदर्शने करणार असल्याचा इशाराही निवेदनातून दिला आहे.

निवेदनातील माहितीनुसार, जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या विरोधात आंदोलन करण्याचा जनतेला अधिकार आहे. गेल्या चार महिन्यांपासून शक्तिपीठ महामार्गाला जिल्ह्यातील शेतकरी विरोध करत आहेत; मात्र त्यांच्या मागण्यांकडे मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष केले आहे. याउलट आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलीस फोन करून अनावश्यक माहिती विचारतात. त्यांच्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न करतात.

हातकणंगलेमध्ये मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्र्यांचे पोस्टर फाडल्याचे खोटे गुन्हे शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आले. शासन पोलिसांच्या दंडूकशाहीचा वापर करून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहे; मात्र जोपर्यंत शक्तिपीठ महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे.