पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळे याची उद्या बुधवारी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सकाळी ९ वाजता कावळा नाका येथील महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्यापासून स्वागत मिरवणूक होणार आहे.
त्यानंतर दसरा चौकात सत्कार समारंभ होणार असून या समारंभात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी केले. या जंगी मिरवणुकीत ढोलताशा, हलगी, झांज पथक सहभागी असतील तर स्वप्नीलवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे.
या कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक डॉ. के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
स्वप्नीलची महाराणी ताराराणी पुतळ्यापासून दसरा चौकापर्यंत भव्य मिरवणूक काढली जाईल. त्यानंतर दसरा चौकात सन्मानपत्र देऊन भव्य सत्कार गौरव सोहळा होईल. मिरवणुकी दरम्यान स्वप्नीलवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. कोल्हापूरच्या सुपुत्राच्या कौतुक सोहळ्यात जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.