रत्नागिरीच्या समुद्रात शनिवारी पोहताना बुडून मुलाचा डोळ्यांसमोरच मृत्यू झाला. हा धक्का सहन न झालेल्या वडिलांनीही प्राण सोडले. विटा येथील फासे कुटुंबावर हा हृदयद्रावक प्रसंग कोसळला आहे.विनायक सुरेश फासे (वय ४५) असे मृत वडिलांचे नाव आहे. ते विट्याचे सुपुत्र आणि वसई -विरार महापालिकेचे वित्त व लेखा अधिकारी होते.
विनायक फासे हे कुटुंबीयांसह शनिवारी रत्नागिरीला पर्यटनासाठी गेले होते. मुलगा सिद्धार्थ ( वय १९) हा पोहण्यासाठी समुद्रात उतरला. त्यावेळी वडिलांना फोटो काढण्यास सांगितले. त्यांनी मोबाइलवर फोटो घेतला आणि वळून पत्नीकडे जाऊ लागले. त्याचवेळी एक मोठी लाट आली. तिने सिद्धार्थला ओढून खोल समुद्रात नेले. सिद्धार्थ बुडत असल्याचे पाहून फासे दाम्पत्याने आरडाओरड केली. बहिणीनेही आकांत केला. तो ऐकून जीवरक्षक पथकाने धाव घेतली. त्यांनी सिद्धार्थला पाण्यातून बाहेर काढले. छातीवर दाब देऊन त्याचा श्वासोच्छ्वास पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला.
प्राथमिक उपचार केले, पण सिद्धार्थचे प्राण गेले होते. डोळ्यांसमोरच मुलाच्या मृत्यूचा धक्का विनायक यांना सहन झाला नाही. मुलाचे प्राण वाचवू शकलो नाही ही खंत रविवारी दिवसभर लागून राहिली होती. मित्रपरिवार, नातेवाईक सांत्वन करत होते; पण विनायक सावरू शकले नाहीत. सोमवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचाही मृत्यू झाला.