शेतकरी, सरकारी कर्मचारी, ज्येष्ठ नागरिकांसाठी खूषखबर….

मागील काही दिवसांपासून राज्य सरकारकडून अनेक महत्वाचे प्रलंबित मुद्दे मार्गी लावले जात आहेत. त्याअनुषंगाने मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत. रविवारी झालेल्या बैठकीतही 19 निर्णय घेण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. मार्च 2024 पासून अंमलबावणी होणार असून त्याचा लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 30 ऑगस्टपर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

राज्यातील जास्तीत- जास्त शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. योजनेची व्याप्ती सरकारकडून वाढवण्यात आली आहे. थकीत देण्यांसाठी महावितरण कंपनीस कर्जाकरिता शासन हमी असेल. त्याचप्रमाणे गटप्रवर्तकांच्या मानधनात चार हजारांची भरीव वाढ करण्यात आली आहे. सहकारी साखर कारखान्यांना शासन हमीवरील कर्ज परतफेडीसाठी संपूर्ण संचालक मंडळावर जबाबदारी असेल.

ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सव्वा कोटी ज्येष्ठांना त्याचा फायदा होणार आहे. ऑलिंपिकवीर स्व. पै.खाशाबा जाधव कुस्ती संकुलाच्या कामास वेग, ‘बार्टी’ च्या ‘त्या’ 763 विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीचा संपूर्ण लाभ, ठाणे येथील महत्वाकांक्षी क्लस्टर योजनेसाठी पाच हजार कोटी निधी उभारणार, असेही निर्णय बैठकीत घेण्यात आले.

पर्यायी खडकवासला फुरसुंगी बोगदा काढण्यावर मंत्रिमंडळात शिक्कामोर्तब करण्यात आले. या निर्णयामुळे पुणे परिसरास सिंचन, पिण्यासाठी अधिक पाणी उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्पासाठी सात हजार 15 कोटींच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. त्याचा नाशिक, जळगाव जिल्ह्याला सिंचनाचा मोठा फायदा होणार आहे.

मुंबई महानगरात रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना झपाट्याने पूर्ण करणार. विविध महामंडळे प्रकल्प राबविणार

– कोल्हापूरचे वारणा विद्यापीठ समूह विद्यापीठ

– कळंबोली येथील पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी भाडेपट्टा, सेवाशुल्क माफ

– चिपळूण, रामटेक, इचलकरंजी येथील जमिनीच्या आरक्षणात फेरबदल

– श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या सरंजाम जमिनींना देण्यात आलेली सूट वंशपरंपरेने त्यांच्या वारसांना

– पाचोऱ्यातील सहकारी सूत गिरणीस शासन अर्थसहाय्य- सहकार भवनासाठी सायन येथील म्हाडाची जमीन