इचलकरंजी येथे जैन मंदिरात चोरी….

इचलकरंजीत दिवसेंदिवस चोरीचा प्रमाणात वाढ होत आहे.मारुती मंदिरातील दानपेटी चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच वर्धमान चौकातील दिगंबर जैन मंदिरात चोरीची घटना घडली आहे.कपाट फोडून दान केलेले एकूण ८ किलो ५० ग्रॅम चांदीचे साहित्य आणि दानपेटीतील रोख ३ हजार रुपये असा एकूण ४ लाख ९६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने पळवला आहे.याप्रकरणी गावभाग पोलिस ठाण्यात नोंद झाली असून, याबाबतची फिर्याद अजितकुमार खंजिरे (वय ६५) यांनी दिली. पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, वर्धमान हाऊसिंग सोसायटी येथे श्री १००८ भगवान महावीर वीसपंथी दिगंबर जिन मंदिर आहे.


या मंदिरात भाविकांनी दान केलेले पुजेचे चांदीचे साहित्य कपाटात सुरक्षित ठेवले होते, तर रोख रक्कम दानपेटीत होती. शनिवारी (ता. २४) रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने मंदिराचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश केला. सुरुवातीला कपाटातील लॉकर फोडून प्रत्येकी १ किलोचे अभिषेक पात्र, पाळणा आणि पांडुक शिला तर प्रत्येकी अर्धाकिलोचे नारळ, पंचमेरू, शांतिधारा कलश, सिंहासन आणि पालखीचे दांडे, ८ नग अभिषेक कलश असे एकूण ८ किलो ५० ग्रॅम चांदीच्या पूजा साहित्यावर डल्ला मारत ४ लाख ९३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पळविला. त्यानंतर समोरच असलेली दानपेटी फोडून त्यातील रोख ३ हजार रुपये चोरले.