विधानपरिषदेला आमदारकीची संधी…..

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय समीकरणे बदलतानाचे चित्र दिसून आले. अनेक पक्षप्रवेश देखील पहायला मिळाले. विधानसभा निवडणुकीत पडद्यामागच्या हालचालींचा फायदा महायुतीच्या उमेदवारांना झाला. कोल्हापूर जिल्ह्यात दहा उमेदवार निवडून आले. तर शिरोळ आणि इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात गेल्या वेळेच्या उमेदवाराने महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. शिरोळमधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सावकार मादनाईक यांनी संघटनेच्या उमेदवाराला पाठिंबा न देता महायुतीचे उमेदवार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना पाठिंबा दिला.

तर इचलकरंजीमधून भाजपचे माजी आमदार सुरेश हळवणकर यांची समजूत काढून आमदार राहुल आवाडे यांना उमेदवारी दिली.राज्यपाल नियुक्त उर्वरित पाच आमदारांच्या निवड यादीत भाजपकडून (BJP) सुरेश हळवणकर यांच्या नावाची शक्यता आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून माजी खासदार संजय मंडलिक यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. पण आता या रेसमध्ये माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सावकार मादनाईक यांना देखील ढकलले आहे. विधानसभा निवडणुकीत सावकर मादनाईक यांनी महायुती पुरस्कृत शाहू आघाडीचे उमेदवार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा प्रचार करत शेतकरी संघटनेचे उमेदवार उल्हास पाटील यांच्या विरोधात प्रचार केला.

त्यामुळे यड्रावकर यांचा विजय झाला. यड्रावकर यांना निवडून आणण्यात मादनाईक यांनी मोठे योगदान दिले. त्यामुळे आता आमदार यड्रावकर यांची विधान परिषदेसाठी मादनाईक यांना संधी देऊन तुम्ही शब्द पाळण्याची वेळ आली आहे. आता सर्वानी मिळून मादनाईक यांना आमदार करूया, असा निर्धार माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी केला. जयसिंगपूर येथील एका खासगी कार्यक्रमात ते बोलत होते.