सध्या इचलकरंजी शहरात विकासकामांचा धडाका सुरु आहे. अनेक समस्या प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. तत्कालीन इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने सर्वसामान्यांना अत्यल्प दरात आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी सुरु केलेले इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल (आयजीएम) सन 2016 मध्ये राज्य शासनाकडे हस्तांतर करण्यात आले. त्यानंतर या रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळून ते इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय (आयजीजीएच) बनले. शासनाकडे हस्तांतर झाल्यापासून याठिकाणी आवश्यक त्या सर्व सेवा-सुविधा मिळाव्यात यासाठी माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी शासन दरबारी पाठपुरावा सुरु ठेवला होता. त्यातूनच कोट्यवधीचा निधी मिळून रुग्णालयाचे रुपडे पालटत आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आमदार राहुल आवाडे यांनीही कामगारांचे शहर असलेल्या इचलकरंजीतील कोणाही रुग्णाला उपचाराविना अन्यत्र जावू लागू नये यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरु ठेवला होता.
त्यातूनच 200 बेडची मान्यता असलेले हे रुग्णालय 300 बेडचे करण्यास शासनाने मान्यता दिली. त्यामुळे याठिकाणी नर्सिंग कॉलेज सुरु झाल्यास आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध होण्यासह कोणीही रुग्ण उपचाराविना राहणार नाही यासाठी आमदार राहुल आवाडे सातत्याने प्रयत्नशील होते. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोबत रुग्णालयात झालेल्या आढावा बैठकीत आमदार आवाडे यांनी रुग्णालयाशी संबंधित प्रश्नांची मांडणी करत ते तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली होती. त्यावर आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सर्वच प्रश्नांची लवकरच मंत्रालयात बैठक घेऊन ते मार्गी लावण्याची ग्वाही दिली होती. आणि अवघ्या काही दिवसातच इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात नर्सिंग कॉलेज सुरु करण्याबाबतच्या प्रक्रियासंदर्भात महाराष्ट्र राज्य सुश्रुषा व परावैद्यकिय शिक्षण मंडळ सक्षमता तपासणी पथकाने रुग्णालयास भेट देऊन माहिती जाणून घेतली होती.
नर्सिंग कॉलेज सुरु करण्याच्या दृष्टीने याठिकाणी असलेल्या सुविधा पाहता नर्सिंग कॉलेज सुरु होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. त्या अनुषंगाने आमदार राहुल आवाडे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून राज्य शासनाने नर्सिंग कॉलेज सुरु करण्यास मान्यता दिली आहे. राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मंगळवारी मान्यता दिली. या रुग्णालयात सर्व अत्याधुनिक सेवा-सुविधांसह नर्सिंग कॉलेज सुरु होण्यासंदर्भात आमदार राहुल आवाडे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यामुळे आता हे रुग्णालय सर्व सुविधांनी सुसज्ज व अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज होणार आहे.