ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) येथे रविवारी रात्री ग्रामस्थांना गावच्या परिसरात चार ते पाच ड्रोन फिरताना आढळले. वारंवार ड्रोन फिरताना आढळल्यामुळे ड्रोनचे गूढ वाढले असून ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. मागील आठवड्यापासून जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चोरीचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. त्यात भरीस भर म्हणून चिकुर्डे व ऐतवडे बुद्रूक परिसरात गेले चार ते पाच दिवस रात्रीच्या दरम्यान आकाशामध्ये ड्रोन घिरट्या घालताना दिसत आहेत.
ऐतवडे बुद्रूक येथील दहा ते बारा युवकांना परिसरात चार ते पाच ड्रोन घिरट्या घालताना आढळले. ड्रोनचे शूटिंग करून काही लोकांनी गावातील सोशल मीडियावर टाकले आहेत. दरम्यान या ड्रोन बद्दल प्रशासन व पोलिस विभागाकडून कोणतेही माहिती नसल्याचे सांगण्यात आले. विक्रम पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक, कुरळप पोलीस ठाणे. परिसरात फिरणाऱ्या ड्रोनचे गूढ वाढले असून ग्रामस्थ भयभीत आहेत. पोलिस व प्रशासनाने या ड्रोनचा तातडीने तपास करावा व ते ड्रोन कोणाचे आहेत याचा शोध लावावा अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.