तृतीयपंथीयांना दिवाळी फराळ देऊन आपुलकीने दिल्या आगळ्या वेगळ्या शुभेच्छा

सांगोला येथील आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने तृतीयपंथीयांना दिवाळी फराळासह कपडे देऊन त्यांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणित केला. आपुलकीच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ४ थ्या वर्षी आपुलकी प्रतिष्ठानाकडून आगळी वेगळी दिवाळी साजरी करण्याचा संकल्प हाती घेऊन समाजापासून नेहमीच उपेक्षित राहिलेल्या व आपल्या उपजीविकेसाठी रस्त्यावर उभं राहून देणाऱ्याकडून मिळेल त्या रकमेतून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या तृतीय पंथीयांची दिवाळी थोड्या प्रमाणात का होईना गोड करण्यासाठी आपुलकीनं पुढाकार घेतला.

सांगोला शहरातील चार तृतीय पंथीयांना दिवाळी फराळासह नवीन कपडे देऊन त्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित केला. यावेळी आपुलकी प्रतिष्ठान अध्यक्ष राजेंद्र यादव, हरिभाऊ जगताप गुरुजी, दादा खडतरे, अरविंद केदार, इंजि. विकास देशपांडे, रविंद्र कदम आदी आपुलकी सदस्य उपस्थित होते. त्याचबरोबर आपुलकी प्रतिष्ठानने वंचितांची दिवाळी गोड व्हावी म्हणून सांगोला शहरातील विविध भागात पालावर राहणाऱ्या नागरिकांना दिवाळी फराळ व भाऊबीजेची ओवाळणी म्हणून साडी भेट देण्यात येणार आहे. यासाठी आपुलकीने सोशल मीडियावर आवाहन केल्यानंतर आपुलकी सदस्य व देगणीदारांकडून सुमारे २६ हजार ५०१ रुपयांची देणगी जमा झाली आहे. त्या देणगीतून ५० कुटुंबाना येत्या शनिवार ११ नोव्हेंबर रोजी दिवाळीची भेट देण्यात येणार असल्याचे आपुलकीचे अध्यक्ष राजेंद्र यादव यांनी सांगितले.