ताराराणी पक्षाच्यावतीने इचलकरंजी विधानसभा मतदार संघातून राहूल आवाडे यांच्या उमेदवारीची घोषणा केल्यानंतर आमदार प्रकाश आवाडे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील इतर सहा ठिकाणी उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा शनिवारी पत्रकार बैठकीत बोलताना केली. त्यांच्या या घोषणेने जिल्ह्यात पुन्हा राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
इचलकरंजी, हातकणंगले, शिरोळमध्ये उमेदवार फिक्स आहेत. तर इतर तीन ठिकाणच्या उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याची माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीसाठी ताराराणी पक्षाच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्यात सहा विधानसभेमध्ये उमेदवार उभे करणार असून, इचलकरंजी विधानसभेसाठी राहुल आवाडे यांची उमेदवारी ही निश्चित झाली असून शिरोळ, हातकणंगलेच्या उमेदवारांची घोषणा राखून ठेवली आहे. तर कागल, पन्हाळा, शाहूवाडी, दक्षिण करवीर, राधानगरी, आदी विधानसभा मतदार क्षेत्रात उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.
जवाहर साखर कारखान्याच्या माध्यमातून कागल मतदार संघात संचालक, कामगार व शेतकऱ्यांमधून नाळ जोडली गेली आहे. यामुळे या मतदार संघात आवाडे गट निर्माण झाला आहे. यामुळे या ठिकाणची परिस्थिती पाहून तगडा उमेदवार देणार, असे संकेत आमदार आवाडे यांनी दिले आहेत.