२७ अश्वशक्तीवरील प्रतियुनिट ७५ पैशांची अतिरिक्त व २७ अश्वशक्तीखालील यंत्रमागाला प्रतियुनिट एक रुपयांची अतिरिक्त वीज सवलत संदर्भातील अध्यादेश येत्या आठवडाभरात जारी होणार आहे. त्यानुसार मार्च २०२४ पासून यंत्रमागधारकांना वीज सवलतीचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल, अशी माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्य शासनाने २७ अश्वशक्तीवरील यंत्रमागाला प्रतियुनिट ७५ पैशांची अतिरिक्त व २७ अश्वशक्तीखालील यंत्रमागाला प्रतियुनिट एक रुपयांची अतिरिक्त वीज सवलत जाहीर केली आहे.
मात्र त्याचा अध्यादेश न निघाल्याने त्यासंबंधी उलटसुलट चर्चा होत आहे. काही विरोधक संभ्रमावस्था निर्माण करत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार आवाडे यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, यंत्रमाग व्यवसायाला ऊर्जितावस्था मिळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व वस्त्राद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वीज सवलत देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री शिंदे यांनी कोरोची येथील कार्यक्रमात २७ अश्वशक्तीवरील यंत्रमागाला प्रतियुनिट ७५ पैशांची अतिरिक्त व २७ अश्वशक्तीखालील यंत्रमागाला प्रतियुनिट एक रुपयांची अतिरिक्त वीज सवलत संदर्भातील जाहीर घोषणा केली.
त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तबही झाले, मात्र जोपर्यंत या संदर्भातील अध्यादेश जारी केला जात नाही, तोपर्यंत सवलतीचा लाभ मिळत नाही. हा अध्यादेश काढण्याचे काम सुरू असून, येत्या आठवडाभरात तो जारी होईल आणि प्रत्यक्षात वीज सवलतीची अंमलबजावणी होईल. मार्च २०२४ पासून सवलतीची अंमलबजावणी होणार असल्याने येणाऱ्या बिलातून मागील रक्कम वजावट होईल