सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्य सरकारमधील मंत्र्यांमध्येच एक वाक्यता नसल्याचे दिसून येत आहे. तर, दुसरीकडे आता राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा मुलगाच सरकारविरोधात मांचा काढणार आहे. दुष्काळग्रस्त तालुका जाहीर करावा या मागणीसाठी राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांचा मुलगा अब्दुल समीर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील आमदाराचा मुलगा आपल्याच सरकारविरोधात मोर्चा काढत असल्याने तालुक्यात चर्चा झाली आहे.
सुरू राज्य सरकारने मागील आठवडयात १५ जिल्ह्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. यामधील बहुतांशी तालुके सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघातील असल्याचे म्हटले जात आहे. तर, शेतकरी संघटनांनी राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. आता, सत्तार यांचा मुलगा अब्दुल समीर यांच्या नेतृत्त्वात सिल्लोड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या नेतृत्वाखाली १९ नोव्हेंबर रोजी सिल्लोड तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. सिल्लोड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीसाठी मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. सिल्लोड तालुक्याची आणेवारी ५० टक्यांपेक्षा कमी आलेली आहे. यावरून सिल्लोड तालुक्यातील खरीप पिकांची दुष्काळाची दाहकता स्पष्ट होते. असे असताना देखील तालुका दुष्काळ यादीतून वगळण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.