राज्याच्या काही भागांमध्ये थंडीची चाहूल लागली आहे. काही शहरांमध्ये थंडी वाढू लागली आहे. तर पहाटेपासून थंडी तर दुपारच्या सुमारास उकाडा जाणवत आहे. अशातच, राज्यासह देशातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नोव्हेंबर महिना सुरू होऊन आठवडा उलटला असला तरी राज्यात अद्याप उकाडा जाणवत आहे. तर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात 9 नोव्हेंबरपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पहाटेपासून कोल्हापूर शहर आणि परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
कालपासून कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.राज्यात गेल्या 3-4 दिवसांपासून ढगाळ वातावरण दिसत आहे.
सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत पुढील दोन दिवस हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भात 10 नोव्हेंबरपासून थंडीत वाढ होईल, असा अंदाज आहे.