एसटीच्या संपावर आज निघणार तोडगा? मुख्यमंत्री शिंदेंनी बोलवली तातडीची बैठक

 एसटी कर्मचारी कृती समिती संघटनेने बेमुदत संपाची हाक दिली आहे. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे, या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलनाची हाक दिली आहे. एसटीच्या संपामुळे राज्यातील प्रवाशांची गैरसोय होताना दिसत आहे. ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक देण्यात आल्याने चाकरमान्यांचेही हाल होत आहेत.

आता या संपाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तातडीची बैठक बोलवली आहे. त्यामुळे आज या एसटीच्या संपावर आज तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर काल मंत्री उदय सामंत आणि एसटी कर्मचारी कृती समितीची एक बैठक पार पडली. या बैठकीत उदय सामंत यांनी कर्मचाऱ्यांना संप मागे घ्या, असे आवाहन केलं. ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांची गैरसोय नको. त्यामुळे संप मागे घ्या, असे उदय सामंत यांनी म्हटले.

पण एसटी कर्मचारी हे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांसोबत झालेली सरकारची ही बैठक निष्फळ ठरली आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एसटी कर्मचारी कृती समितीसोबत बैठक होणार आहे. आज संध्याकाळी 7 च्या दरम्यान सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्‍यांसमोर एसटी कर्मचारी आपल्या मागण्या मांडणार आहे. त्यामुळे आता या बैठकीत काही तोडगा निघणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.