राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी, एकनाथ शिंदे यांनी दिले मोठे संकेत

राज्याच्या विधानसभा निवडणुका कधी जाहीर होणार या संदर्भात अनेक चर्चा सुरु होत्या. महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरपर्यंत आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीसोबत महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होईल अशी अपेक्षा होती. मात्र, निवडणूक आयोगानं हरियाणा आणि जम्मू काश्मीरची विधानसभा निवडणूक जाहीर केली.

त्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक कधी जाहीर होणार अशा चर्चा रंगल्या होत्या. राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल, अशा देखील चर्चा झाल्या. मात्र, आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीचे संकेत दिले आहेत. राज्यात विधानसभा निवडणूक कधी लागणार याचा अंदाज देखील  शिंदे यांनी वर्तवला आहे.  

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चांदीवली येथील एका कार्यक्रमात विधानसभा निवडणुकीचे संकेत देण्यात आले. राज्यात नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका असल्याचे संकेत एकनाथ शिंदे यांनी दिले. येत्या दोन महिन्यानंतर नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी चांदिवली विधानसभा मतदारसंघातून दिलीप लांडे यांना निवडून देण्याचं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले.