अजितदादा तिघांना पाठवणार विधान परिषदेत; ‘या’ नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

मागील अडीच वर्षांपासून रखडलेली राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषदेच्या 12 आमदारांची नियुक्ती विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीन नावांची जोरदार चर्चा आहे.पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी या तीन नेत्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केल्याचे समजते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, मुंबै बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे आणि ठाण्याचे अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नावांची चर्चा आहे. पक्षाकडून या तिघांच्या नावाची शिफारस केली जाणार असल्याचे वृत्त दिले आहे.यापूर्वीच अजित पवारांकडून विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी विधान परिषदेच्या जागा भरण्याचे सुतोवाच करण्यात आले होते.

एकूण 12 जागांपैकी भाजपला सर्वाधिक सहा आणि एनसीपी व शिवसेनेला प्रत्येकी तीन जागा मिळणार असल्याचे समजते.राज्यपाल नामनिर्देशित 12 आमदारांच्या नियुक्तीबाबतची याचिका मुंबई हायकोर्टात प्रलंबित आहे. त्यावर 1 ऑक्टोबरला पुढील सुनावणी होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत नियुक्ती न करण्याचे आदेश दहा दिवसांपूर्वी कोर्टाने दिले आहेत. मात्र, पुढील सुनावणीला कोर्ट काय निकाल देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात 12 आमदारांची यादी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात आली होती. मात्र, त्यांनी काही नावांवर आक्षेप घेत अनेक महिने या नियुक्त्या केल्या नाहीत. याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुनील मोदी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली असून त्यावर सुनावणी सुरू आहे.