हुपरी पंचक्रोशीतील गावांमध्ये गणपती बाप्पांच्या आगमनासाठी लगबग सुरू झाली आहे. अनेक उत्साही युवक सगळ्यांपेक्षा आपला बाप्पा कसा सुंदर असणार यासाठी तन मन धन अर्पण कामाला लागले आहेत. यामध्ये बालमित्र मागे नाहीत. बाप्पाच्या आगमनासाठी बाजारपेठ सजली आहे. बाजारात सजावटीसाठी असंख्य शोभिवंत नमुने उपलब्ध आहेत. विद्युत रोषणाईमध्ये डोळे दिपून जातात इतक्या व्हरायटी पहायला मिळत आहेत. आकर्षक मंडप घालण्यासाठी रात्री जागत आहेत.
आकर्षक विद्युत रोषणाई, देखावे, सजावटीसाठी बाजारात प्रचंड प्रमाणात उलाढाल होत आहे. धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल, पारंपारिक पद्धतीने उत्सव साजरा होण्यासाठी काहीजणांचा आटापिटा भाव खाऊन जात आहे. बैंडबाजा, बॅन्जो, झांज पथक, लेझीम, ढोल ताशांचा कडकडाट पहायला मिळणार आहे.
अंतर्गत सजावटीसाठी मंडळाचे कार्यकर्ते अखेरचा हात फिरवत आहेत. मात्र गणेश मंडळांनी घराघरातील ज्येष्ठ नागरिकांची आठवण ठेवून आवाजाची तीव्रता वाढत जाणार नाही याची काळजी घेत ध्वनिप्रदूषण टाळावे व सामाजिक जबाबदारीचे भान ठेवावे, अशी अपेक्षा वयोवृद्ध नागरिकांनी व्यक्त केली आहे.