जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणारा संशयित राजेंद्र भीमराव नेर्लेकर (रा. शिवाजीनगर, हुपरी, ता. हातकणंगले) याच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
त्याने ताराबाई पार्क येथील वन प्लस सोल्युशन कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना गंडा घातला आहे. याबाबत प्रकाश केशव पाटील (वय ३४, रा. उत्तर तांबवे, ता. कराड, जि. सातारा) यांनी फिर्याद दिली असून, त्यांच्यासह दोघांची २० लाखांची फसवणूक झाली.पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताराबाई पार्क येथील आदित्य कॉर्नर परिसरात वन प्लस सोल्युशन कंपनीचे कार्यालय सुरू होते. कंपनीचा प्रमुख राजेंद्र नेर्लेकर याने जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून पैसे घेतले. त्याच्या आमिषाला बळी पडून फिर्यादी प्रकाश पाटील यांनी जानेवारी २०२१ मध्ये १२ लाख रुपये भरले. परताव्यापोटी त्यांना ४ लाख १५ हजार रुपये मिळाले.
मात्र, मार्च २०२२ नंतर परतावे बंद झाले आणि मुद्दलही अडकली. त्यांच्या मित्राचे ११ लाख ७० हजार रुपये कंपनीत अडकले. वारंवार मागणी करूनही पैसे परत मिळत नसल्याने त्यांनी अखेर शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. २० लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा पोलिसांनी संशयित नेर्लेकर याच्यावर दाखल केला. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांनी दिली.