इस्लामपूर शहर व वाळवा तालुक्यात अनेक ठिकाणी दरोडे, चोऱ्या व मारहाणीसारखे प्रकार घडत आहेत. यावर आळा घालावा यासाठी महाडिक युवाशक्तीतर्फे इस्लामपूर पोलिसांना निवेदन देण्यात आले. यावेळी सतीश महाडिक म्हणाले, शहरात चेन स्नॅचिंग, घरफोडी व मारहाण करून दहशतीचे वातावरण तयार करण्यात येत आहे. अंधार पडल्यावर डिजिटल ड्रोनचा वापर चोऱ्यांसाठी होणे ही भीतीदायक गोष्ट आहे. नागरिकांच्या मनात भीती बसली आहे.
रात्री बाहेर पडणेही असुरक्षित झाले आहे. काही दिवसातच गणपती उत्सवाला सुरुवात होत आहे. त्यामुळे पोलिसांनी चोर व दरोडेखोराना लवकरात लवकर पकडून शासन करावे व नागरिकांच्या मनातील भीती घालवावी. सुजित थोरात म्हणाले, पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे रात्री उडणारा ड्रोन डिपार्टमेंटचा नाही, असा ड्रोन दिसला तर तो पाडा अन्यथा पोलिसांना संपर्क साधा, तसेच ज्याप्रमाणे ग्रामीण भागातील लोकांनी गस्त सुरू केली आहेत. त्याप्रमाणे शहरातील नागरिकांनीही पोलिसांना बरोबर घेऊन गस्त घालावी.