राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी कार्बन क्रेडिट शिबिराचे आयोजन केले आहे. जमिनीतील कार्बनचे मोठ्या प्रमाणात उत्सर्जन होऊन पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर कार्बनचे उत्सर्जन रोखण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. यातूनच कार्बन क्रेडिटही संकल्पना पुढे आली आहे. आपल्या परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कार्बन क्रेडिट उपक्रमात सहभागी होऊन उत्पन्नाचा नवा स्रोत मिळवावा, असे आवाहन त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले.
कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, जलसिंचन समितीचे अध्यक्ष प्रदिपकुमार पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी जे. एस. पाटील, तालुका कृषी अधिकारी इंद्रजीत चव्हाण, ग्रो इंडिगो प्रा. लि. चे उज्ज्वल पाटील, आण्णा पऱ्हे, मिनल इनामके हे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रतिक पाटील पुढे म्हणाले, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस तोडणीनंतर शेतातील पाचट न जाळता त्याचे शेतातच आच्छादन करावे, ठिबक सिंचनद्वारे पाणी व खताचे व्यवस्थापन करावे.
तसेच आपल्या शेतात मशागत करू नये, अथवा कमीत-कमी मशागत करावी. यामुळे कार्बनचे कमीत-कमी उत्सर्जन होऊन पर्यावरणाचा चांगला समतोल राहू शकतो. याचे सॅटेलाईटद्वारे मोज- माप करून शेतकऱ्यांना त्याचा मोबदला दिला जाऊ शकतो. कोणतीही गुंतवणूक, अथवा जादा खर्च न करता शेतकऱ्यांना नवे उत्पन्न मिळू शकते. जागतिक पातळीवर तसेच औद्योगिक क्षेत्रात याबद्दल मोठे काम चालू आहे. याचा लाभ आपण घ्यायला हवा. आपण गाताडवाडी व बोरगाव येथील पाणी पुरवठा योजनांच्या कार्यक्षेत्रात सामुदायिक सच्छिद्र पाईप निचरा प्रणाली राबवित आहोत.
ग्रो इंडिगो कंपनीचे तांत्रिक मार्गदर्शक उज्ज्वल पाटील म्हणाले, या उपक्रमात सहभागी शेतकऱ्यांची मोबाईल ॲपद्वारे नोंदणी केली जाणार आहे. यानंतर आंतर राष्ट्रीय लेखा परीक्षणाने प्रत्येक शेतकऱ्याने किती प्रमाणात कार्बनचे उत्सर्जन रोखले, याचे मूल्यमान करून त्याचा मोबदला त्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.