जबलपूरहून बेंगळुरूकडे येणाऱ्या सैन्य दलाच्या वाहनाला अपघात झालाय. मागून येणाऱ्या एका खासगी टँकरने सैन्य दलाच्या वाहनाला जोरदार धडक दिली. यात एक जवान ठार झाला तर एक गंभीर जखमी झालाय. अपघाताची घटना दुपारी १२ च्या सुमारास घडली. मृत झालेला जवान सांगली जिल्ह्यातील लोणारवाडी गावचे सुपुत्र आहेत.
पोपट भगवान खोत, असं या जवानाचं नाव आहे. पोपट खोत पॅरा कमांडोचे हवालदार म्हणून कार्यरत होते. मृत्यूमुळे लोणारवाडी गावावर शोककळा पसरली आहे. अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी आणि लष्कराने पोपट खोत आणि त्यांच्या सहकारी जवानाला रुग्णालयात दाखल केलं. परंतु उपचारादरम्यान खोत यांचा मृत्यू झाला. खोत यांच्या मृत्यूची वार्ता कळताच संपूर्ण कवठेमहांकाळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे. पोपट खोत हे ३४ वर्ष वयाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, आई आणि बहिणी असा परिवार आहे.
पोपट खोत यांचं पार्थिव त्यांच्या गावी लोणारवाडी येथे आणलं जात आहे. कर्त्यव्य बजावत असताना, पोपट खोत यांचा अपघाती मृत्यू झाला असून, त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.