हातकणंगले विधानसभा मतदारसंघात स्वाभिमानीकडून जोडण्या सुरू

आगामी विधानसभा निवडणुका या दिवाळीनंतर होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये हातकणंगले मतदार संघातील मराठा समाज धैर्यशील माने यांच्यासाठी एकवटेला होता. मात्र विधानसभेची गणिते मात्र फार वेगळी आहेत. या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचा उमेदवार असणार नाही. त्यामुळे मतदारसंघातील मराठा समाजाची या मतदारसंघात निर्णायक असलेली 62000 मते स्वाभिमानीकडे वळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांची मदत घेतली जाणार आहे.

चार दिवसांपूर्वीच जरांगे यांची जालना येथे शेट्टी यांनी भेट घेऊन चर्चा देखील केल्याचे समजत आहे. हातकणंगले विधानसभा मतदारसंघावर आतापर्यंत बाहेरील उमेदवार आलेला आहे. जयवंतराव आवळे, राजीव आवळे, डॉ. सुजित मिणचेकर या बाहेरील उमेदवारांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तर आता आ. राजूबाबा आवळे यांना महाविकास आघाडीकडून तर महायुतीकडून डॉ. अशोकराव माने यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. हे दोघेही स्थानिक नाहीत.

त्यामुळे जन्म आणि कर्मभूमीतील वैभव कांबळे यांच्या उमेदवारीचा स्वाभिमानीला नक्कीच फायदा होऊ शकतो. यांच्या उमेदवारीमुळे बौद्ध मते महाविकास आघाडीकडून स्वाभिमानीकडे वळू शकतात.