इचलकरंजीत भाजप मेळाव्यास्थळी हाळवणकर कार्यकर्त्यांच्या पोस्टरबाजीने वेधले सर्वांचे लक्ष

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात भाजपची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज इचलकरंजी दौऱ्यावर आहेत. भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या समर्थनार्थं कार्यकर्त्यांचा मेळावा इचलकरंजीत पार पडत आहे.विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी हाळवणकर यांनी देखील इच्छा व्यक्त करून दाखवली आहे. मात्र त्यांचे राजकीय पुनर्वसन करून हाळवणकर यांना विधान परिषदेवर घेण्याची तयारी भाजपने केली होती. मात्र राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न निकाली लागल्यानंतर दोन दिवसांपूर्वी काही आमदारांचा शपथविधी पार पडला. शपथविधीमध्ये हाळवणकर यांचे नाव नसल्याने त्यामध्ये आणखी नाराजी वाढली आहे.या पार्श्वभूमीवर आज इचलकरंजी येथे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या गटाचा मेळावा आहे.

मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर हाळवणकर समर्थकांनी मेळाव्यास्थळी पोस्टरबाजी करत लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. इतकेच नव्हे तर भाजपचे जेष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांचे कार्यकर्ता प्रति असणारी भावना दाखवणारे पोस्टर या मेळाव्यात प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आले आहे. ” मेरी एक बात गाठ बांध लेना, हमारा एक भी पुराना कार्यकर्ता टूटना नही चाहिये!, नये चाहे दस टूट जाये, क्यूकी पुराना कार्यकर्ता हमारी जीत की ग्यारंटी है! नये कार्यकर्ता पर विश्वास करना जल्दबाजी है. अशा आशयाचे फलक प्रवेशद्वारावरच लावण्यात आले आहे.

दरम्यान प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे स्थळी येत असताना कार्यकर्त्यांनी अनोखे पोस्टर दाखवत त्यांचे स्वागत केले. माजी आमदार हळवणकर यांचा फोटो असलेल्या पोस्टरवर ‘निष्ठेचा हाच का न्याय?’असे फलक दाखवत बावनकुळे यांचे स्वागत करण्यात आले. मेळाव्यात माजी आमदार सुरेश हळवणकर हे भाषणासाठी उभे राहिले असताना कार्यकर्त्यांनी हेच गोष्ट दाखवले. मात्र कार्यकर्त्यांना हाळवणकर यांनी दरडावले. अशी पोस्टरबाजी करून चालणार नाही याचा फटका आपल्यालाच बसेल. असे सांगत कार्यकर्त्यांना पोस्टर खाली करण्यास सांगितले.