इचलकरंजीत बनावट वखार पावत्यांद्वारे १३.४१ कोटींची फसवणूक

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची तब्बल 13 कोटी 41 लाख 71 हजार 866 रुपयांची फसवणूक व अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे. विभागीय गोदामातील साहित्याच्या कर्जाच्या बनावट पावत्या बँकेत तारण ठेवून खोटी कागदपत्रे व पावत्या बनवणे आणि रजिस्टरमध्ये खोट्या नोंदींसह विमा कंपनीकडे पैसे न भरता गोदामाचे भाडे बुडवत ही फसवणूक करण्यात आली आहे.

याप्रकरणी गावभाग पोलिसांनी वखार महामंडळाचा निलंबित सहायक साठा अधीक्षक तथा इचलकरंजी केंद्रप्रमुखासह 19 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

याबाबतची फिर्याद वखार महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापक तृप्ती कोळकर यांनी दिली.इचलकरंजीतील वडगाव बाजार समिती परिसरात वखार महामंडळाचे गोदाम आहे. ऑक्टोबर 2022 ते मार्च 2024 या कालावधीत केंद्रप्रमुख पेंढारी याने संशयितांना हाताशी धरून संगनमताने ही फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

गोदामाची पाहणी केल्यानंतर फसवणूक व अपहाराचा प्रकार उघडकीस आला. पेंढारी याच्यासह अन्य 18 संशयितांनी संगनमत करत शासकीय गोदामाचे व सांगली अर्बन बँक शाखा इस्लामपूरच्या कर्जाच्या रकमेच्या खोट्या पावत्या बँकेत तारण ठेवून खोटी कागदपत्रे, पावत्या बनवल्या. तसेच रजिस्टरमध्ये खोट्या नोंदी करून तसेच विम्याची रक्कम विमा कंपनीस भरली नाही.

तसेच वखार महामंडळाचे भाडे बुडवले व तब्बल 13 कोटी 41 लाख 71 हजार 866 रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रात्रीतून तातडीने हालचाली करीत पोलिसांनी 11 संशयितांना ताब्यात घेतले, तर उर्वरितांचा कसून शोध सुरू आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत वाघमारे करीत आहेत.

गुन्हे दाखल असलेल्या संशयितांपैकी चंद्रकांत नानासो मगर (वय 56, रा. नागाव, ता. वाळवा), पोपट मुरलीधर पाटील (60, रा. भडकंबे, ता. वाळवा), श्रेयस संजय माने (23, रा. ताकारी), कुमार दशरथ जाधव (59, रा. ताकारी, ता. वाळवा), आनंदा बाबुराव जाधव (65, रा. घोगाव), प्रल्हाद बाबुराव जाधव (रा. घोगाव, ता. पलूस), जयंत नरहर व्यास (53, रा. इस्लामपूर), ज्ञानेश्वर नारायण पेठकर (49), यश सुधीर जाधव (22, दोघे रा. ताकारी), सुशांत माणिकराव कोळेकर (28, रा. रेठरे हरणाक्ष, ता. वाळवा), कृष्णात पोपट फारणे (52, रा. फारणेवाडी, ता. वाळवा) या 11 जणांना अटक केली आहे.

या सर्वांना न्यायालयासमोर हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मुख्य संशयित निलंबित सहायक साठा अधीक्षक तथा केंद्रप्रमुख महम्मद शाबुद्दीन पेंढारी (रा. रुकडी), रज्जाक नूरमहम्मद मोठलानी, तय्यब रज्जाक मोठलानी, तब्बसुम तय्यब मोठलानी (सर्व रा. ताकारी, ता. वाळवा), महाराष्ट्र ट्रेडिंग कंपनी, ताकारी, इरफान तय्यब मोठलानी, मयूर विठ्ठल भोसले (रा. विटा), साहेबराव बबन आडके (रा. तुपारी, ता. पलूस), तानाजी आनंदा मराळे (रा. दह्यारी, ता. पलूस) या आठजणांचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली.