चारचाकी वाहन खरेदीपोटी दिलेले दोन चेक न वटता परत आल्याने २० लाख ५० हजाराच्या फसवणूक प्रकरणी अमरजित अशोक घाट (रा. विकासनगर) याच्यावर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रतिक संतोष मालु (वय ३० रा. कागवाडे मळा) याने फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, संशयित अमरजित घाट याने प्रतिक मालू याच्याकडून सन २०२२ मध्ये एमएच ०९ एफक्यु ००८४ ही किया कंपनीची कार २० लाख ५० हजाराचा खरेदीचा करार केला होता.
त्यापोटी ५ लाख रुपये रोख आणि उर्वरीत १५ लाख ५० हजाराचे कर्ज भरण्याबाबत घाट याने करार केला होता. घाट याने रोख रकमेपोटी बँक ऑफ बडोदाचे दोन चेक देऊन सदरची कार ताब्यात घेतली होती. परंतु घाट याने दिलेले दोन्ही चेक न वटता परत आले. याबाबत मालू याने विचारणा करता कार परत मागितली असता घाट याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याने प्रतिक मालू याने घाट याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोहेकॉ चव्हाण करत आहेत.