हातकणंगले विधानसभा मतदारसंघात महायुतीवर वाढला दबाव!

महायुतीमध्ये हातकणंगले विधानसभा मतदारसंघावर शिवसेना शिंदे गट, भाजप आणि घटक पक्ष असलेल्या आमदार विनय कोरे यांच्या ‘जनसुराज्य शक्ती’ पक्षानं दावा केला आहे. विद्यमान आमदार काँग्रेसचा असल्याने मागीलवेळी या मतदारसंघातून ‘जनसुराज्य शक्ती’चे उमेदवार अशोकराव माने यांनी निवडणूक लढवली होती. त्यामुळे हा मतदारसंघ ‘जनसुराज्य शक्ती’ पक्षाकडेच जाईल, अशी शक्यता आहे.

इचलकरंजीमधील ताराराणी आघाडीचे आणि महायुतीचे घटक पक्ष असलेले आमदार प्रकाश आवाडे यांनी महायुतीवरील दबाव आणखीन वाढवला आहे. इचलकरंजी मतदारसंघातून उमेदवार जाहीर केला असताना आमदार आवाडे यांनी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी पवार गटावर दुसरा वार केला आहे. आमदार आवाडे यांनी इचलकरंजी पाठोपाठ हातकणंगले विधानसभा मतदारसंघात दुसरा उमेदवार जाहीर केला. हेरले येथील माजी सभापती जयश्री जयवंत कुरणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

मात्र, आमदार प्रकाश आवाडे यांनी ताराराणी पक्षाकडून स्वतःचा उमेदवार जाहीर केला आहे. दरम्यान, आमदार प्रकाश आवाडे यांनी परस्पर इचलकरंजी मतदारसंघात त्यांचे सुपुत्र राहुल आवाडे यांची उमेदवारी जाहीर करून भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची गोची निर्माण केली होती. आता तोच पॅटर्न हातकणंगले विधानसभा मतदारसंघात राबवत त्यांनी परस्पर ताराराणी आघाडीचा उमेदवार जाहीर करून महायुतीची कोंडी केली आहे. त्यामुळे महायुती आणि विनय कोरे यांचा ‘जनसुराज्य पक्ष’ कोणती भूमिका घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.