निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोला मतदासंघांत महायुती अन्‌ मविआमध्ये बंडखोरीचे संकेत!

शेकापचा बालेकिल्ला म्हणून सांगोला ओळखला जात होता.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यात सर्वच राजकीय पक्षाचे वातावरण चांगलेच तापले आहे. या मतदारसंघातून एकाच पक्षातून गणपतराव देशमुख यांनी तब्बल ११ वेळा विधानसभेची निवडणूक जिंकली होती. परंतु 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शेकापच्या बालेकिल्ल्याला आमदार शहाजी पाटील व माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी पक्षभेद विसरून एकत्र येत सुरुंग लावला होता. अल्पशा मतात सांगोल्यात शेकापचा पराभव झाला होता.

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर शेतकरी कामगार पक्षांमध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती. 2019 चे शेकापचे उमेदवार डॉ. अनिकेत देशमुख शिक्षणासाठी बाहेर गेल्यामुळे तालुक्यात गणपतआबांचे दुसरे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले.सध्या आमदार शहाजी पाटील यांनी निवडणुकीतून आपण माघारी घेणार नसल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनीही आता नाही तर कधीच नाही असे म्हणत ईश्वराची शपथ घेऊन या निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचे सांगीतले आहे.

शेकापचे कार्यकर्तेही आबासाहेब प्रति बाबासाहेब अशी सोशल मीडियावर मोठी चर्चा करत होते. परंतु या दोन चुलत बंधूंमध्ये सध्या नेतृत्ववाद असल्याचे दिसून येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत हा नेतृत्व वाद कसा मिटणार? याकडे लक्ष लागून राहिले आहे.मागील निवडणुकीमध्ये पक्षभेद विसरून एकत्र निवडणूक लढवलेले आबा-बापू या निवडणुकीमध्ये कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माजी आमदार साळुंखे-पाटील यांनी माघार घेतली नाही तर महायुतीच्या उमेदवारीचा पेच निर्माण होणार आहे. साळुंखे-पाटील यांचे कार्यकर्तेही आता कोणत्याही परिस्थितीत दीपकआबांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह करीत असल्याचे चित्र सध्या आहे.

सध्या सांगोल्यात महायुतीमधील शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील या दोघांनाही निवडणूक लढवणारच, असे सांगितले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये शेकापमधील डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याबरोबरच गेल्यावेळी निवडणूक लढविलेले डॉ. अनिकेत देशमुख यांनीही निवडणूक लढविण्याचे संकेत दिल्यामुळे महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंकडे बंडखोरी होण्याची शक्यता सध्यातरी दिसून येत आहे.