सध्या मराठा आणि ओबीसी आंदोलनाचा मुद्दा ऐरणीवर आहे. अनेकदा उपोषण यासाठी केले जात आहे. आरक्षणाच्या मुद्द्यासाठी धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आलेला आहे. महाराष्ट्रात धनगर समाजाकडून पुन्हा एकदा एल्गार पुकारण्यात आलेला आहे. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी पंढरपूर येथे धनगर बांधव राज्यस्तरीय आंदोलन उपोषण करत आहेत. या उपोषणास गुरुवारी म्हणजेच बारा सप्टेंबर रोजी शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉ. अनिकेत देशमुख यांनी भेट देऊन मागण्या जाणून घेत उपोषणकर्त्यांच्या तब्येतीची चौकशी केली.
राज्य सरकारने धनगर समाजाचे पालकत्व स्वीकारून सनदशीर पद्धतीने चर्चा करून सकारात्मक मार्ग काढावा. जर राज्य सरकारने लवकरात लवकर धनगर समाजाच्या अनुसूचित जातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी नाही केली तर त्याचे परिणाम नजीकच्या कालावधीत दिसून येतील असा इशारा देखील डॉ. अनिकेत देशमुख यांनी दिला.
उपोषणकर्त्यांना मी आपल्यासोबत असल्याचा शब्द देत धनगर आरक्षण मिळेपर्यंत खांद्याला खांदा लावून समाज बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे लवकरात लवकर शासनाने तोडगा काढावा आणि धनगर समाजाला न्याय द्यावा अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉ. अनिकेत देशमुख यांनी केलेली आहे.