दुर्गंधीयुक्त पाण्यावरून खोतवाडीत चिघळला वाद! तक्रारदारावरच गुन्हा दाखल

अलीकडच्या काळामध्ये अनेक भागांमध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. या घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका देखील निर्माण होऊ लागलेला आहे. तसेच डासांचे प्रमाण देखील अनेक भागांमध्ये वाढल्यामुळे डेंगू, मलेरिया सारख्या आजारांचा सामना करावा लागतो आहे. हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी येथील हनुमान मंदिराच्या मागील बाजूस असणाऱ्या नवीन वसाहतीमध्ये पोटे, उदगावे, सटाले यांच्या मालकीची सामायिक विहीर आहे. या विहिरीमध्ये खूपच दुर्गंधयुक्त पाणी तसेच कचरा साठलेला आहे. यामुळे या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे या परिसरातील लहान मुलांसह नागरिकांना अनेक आजाराला सामोरे जावे लागत आहे.

खोतवाडी येथील बबन खोत या सामाजिक कार्यकर्त्याने कचरा टाकलेल्या विहिरीतील दुर्गंधीयुक्त पाणी उपसावे किंवा विहीर मुजवावी अशी मागणी केली होती तसा मासिक सभेत ठराव ही झालेला होता. तरीही ग्रामपंचायतने ही विहीर मुजवली नाही. याचा राग मनात धरून ग्रामपंचायतीने केवळ आश्वासने देण्यात वेळ घालविल्याने सामाजिक कार्यकर्ते बबन खोत यांनी खोतवाडी ग्रामपंचायतमध्ये येऊन प्रिंटर व खुर्चीची मोडतोड केली. खोतवाडी ग्रामपंचायतीने याबाबत तक्रारदारावरच शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंद करून बबन खोत यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यामुळे या भागातील नागरिकांनी निषेध व्यक्त करत ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिलेला आहे.