महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भुदरगड तालुक्यातील आदमापूर येथील बाळूमामांचा भंडारा यात्रा आज दि. ५ ते ७ एप्रिल या कालावधीत संपन्न होत आहे. मोठी गर्दी लक्षात घेऊन शुक्रवार दि ५ पासून या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले असल्याची माहिती भुदरगड चे पोलीस निरीक्षक किरण पाटील यांनी दिली आहे.
शिवाय यात्रा काळात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या या भंडारा यात्रेकरिता अडीच ते तीन लाख भाविक येतील असा अंदाज असून संख्या वाढणार आहे. या गोष्टी लक्षात घेऊन भाविकांची दिवसेंदिवस पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित व इचलकरंजीचे अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खातमोडे- पाटील यांनी या यात्रेचे गांभीर्य घेऊन यात्रेकरिता १ उपविभागीय पोलीस अधिकारी, १ पोलीस निरीक्षक, १० पोलीस उपनिरीक्षक, १२० पोलीस कर्मचारी असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
तसेच भाविकांचे सुविधा करता पार्किंग मध्ये पोर्टेबल टॉयलेटची व पाण्याची सुविधा करण्यात आलेली आहे. तसेच पार्किंग करता उड्डाण पुलाचे पूर्व बाजूस भीष्मा पार्किंग, उड्डाणपुलाचे पश्चिम बाजूस आर. के. इंजीनियरिंग, पाटणे मिल पार्किंग मुदाळ तिट्टा, गणपतराव फराकटे पार्किंग मुदाळतिटा, निढोरी गावाचे अलीकडील बाजूस पाटील पार्किंग, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मुदाळ तिड्डा ते निपाणीकडे जाणारी वाहतूक कुर व्हनगुती वाघापूर मार्गे वळवण्यात आली आहे. तसेच निढोरीकडून गारगोटी कोल्हापूर राधानगरी जाणारी वाहतूक ही निढोरी-सोनाळी-बिद्री या मार्गे वळवण्यात आले आहे. तरी भाविकांनी यात्रा उत्साहात साजरी करण्याकरता पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही भुदरगड पोलिसांनी केले आहे.
