पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या जाणाऱ्या या भेटवस्तूंची मूळ किंमत सुमारे दीड कोटी रुपये असेल.सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी ही माहिती दिली आहे.
पॅरालिम्पिक पदक विजेत्यांचे शूज आणि इतर गोष्टींपासून ते राम मंदिराच्या प्रतिकृतीपर्यंत सर्व गोष्टींचा यात समावेश असणार आहे. गजेंद्र सिंह शेखावत यांनी सोमवारी नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचे प्रदर्शन करणाऱ्या प्रदर्शनाला भेट दिली.
यानंतर त्यांनी सांगितले की, या भेटवस्तूंचा लिलाव करण्यासाठी आधारभूत किंमत सरकारी समिती ठरवते. या वस्तूंची किंमती किमान 600 रुपये ते कमाल 8.26 लाख रुपये आहे.ते म्हणाले की, पंतप्रधानांनी त्यांना मिळालेल्या भेटवस्तू आणि स्मृतिचिन्हांचा लिलाव करण्याची नवी संस्कृती सुरू केली आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही ते हे करत होते. मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव करुन त्यांना मिळणाऱ्या पैशांचा वापर गंगा स्वच्छ करण्यात गुंतवला जातो. हा सहावा लिलाव असणार आहे. यावेळीही मिळालेली रक्कम राष्ट्रीय गंगा निधीला दान केली जाणार आहे.
गेल्या वर्षभरात पंतप्रधान मोदींना भेटवस्तू म्हणून मिळालेल्या 600 वस्तूंचा लिलाव होणार आहे. सर्वात जास्त आधारभूत किंमत असलेल्या भेटवस्तूंमध्ये पॅरालिम्पिक कांस्यपदक विजेते नित्या श्रीशिवन आणि सुकांत कदम यांचे बॅडमिंटन रॅकेट आणि रौप्य पदक विजेता योगेश खातुनियाचे डिस्कस आहेत. त्यांची मूळ किंमत सुमारे 5.50 लाख आहे.