ऑस्ट्रेलियाविरूद्ध फायनलला शतक ठोकत एडन मारक्रमने रचला इतिहास

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२३-२५ च्या अंतिम सामन्याच्या तिसऱ्या दिवसाअखेर दक्षिण आफ्रिकेची स्थिती मजबूत झाली आहे. एडन मारक्रमच्या (Aiden Markram) नाबाद शतकामुळे आफ्रिकेने विजयासाठी असलेले २८२ धावांचे लक्ष्य जवळपास गाठले. मारक्रमने नाबाद १०२ धावांची खेळी करत अनेक विक्रम केले आणि दिग्गजांच्या यादीत स्थान मिळवले. एडन मारक्रमच्या शानदार खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने अंतिम सामन्यात चांगली पकड मिळवली आहे. तिसऱ्या दिवसाअखेर त्यांनी २ बाद २१३ धावा केल्या असून त्यांना विजयासाठी केवळ ६९ धावांची आवश्यकता आहे.

प्रत्येक फलंदाजाचे आयसीसीच्या स्पर्धांमध्ये शतक झळकावण्याचे स्वप्न असते. अंतिम सामन्यात ते पूर्ण झाल्यास आणखी विशेष ठरते. एडन मारक्रम दक्षिण आफ्रिकेसाठी आयसीसीच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरला आहे. मारक्रम आता सौरव गांगुली आणि रिकी पॉटिंग यांच्यासोबत त्या खास यादीत सामील झाला आहे, ज्यांनी आपल्या देशासाठी आयसीसीच्या अंतिम सामन्यात पहिले शतक झळकावले.

लॉर्ड्सच्यामैदानावर मारक्रमने आणखी एक विक्रम केला आहे. तो या मैदानावर पहिल्या डावात शून्यावर आऊट होत नंतर दुसऱ्या डावात शतक झळकावणारा नववा खेळाडू ठरला आहे. एडन मारक्रम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या डावात विशेष काही करू शकला नाही, तो मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर शून्यावर बाद झाला. मात्र, दुसऱ्या डावात त्याने शानदार शतक ठोकले.