वैभव सूर्यवंशीचा कहर, 14व्या वर्षीच 90 चेंडूत 190 धावा केल्या?

आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून शानदार कामगिरी करणाऱ्या बिहारच्या 14 वर्षीय क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi)पुन्हा एकदा आपल्या जबरदस्त फॉर्मने सर्वांना प्रभावित केले आहे. भारताच्या आगामी इंग्लंड अंडर-19 दौऱ्यापूर्वी, सूर्यवंशीने पुन्हा कमाल केल्याचे पाहायला मिळत आहे. या सराव सामन्यात फक्त 90 चेंडूत 190 धावा केल्याचे म्हटले जात आहे.

राजस्थान रॉयल्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये हा तरुण फलंदाज चौकार आणि षटकारांचा वर्षाव करताना दिसत आहे. हा व्हिडिओ कधी आणि कुठून आहे याबद्दल कोणतीही माहिती नाही. 27 जूनपासून सुरू होणाऱ्या दौऱ्यात भारतीय अंडर-19 संघ इंग्लंडविरुद्ध पाच युवा एकदिवसीय सामने आणि दोन युवा कसोटी सामने खेळणार आहे. हे सर्व सामने इंग्लंडमधील होव्ह येथील काउंटी ग्राउंड येथे होतील. सूर्यवंशीचा गेल्या महिन्यात आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील भारतीय अंडर-19 संघात समावेश करण्यात आला होता. आता तो या दौऱ्यासाठी लवकरच इंग्लंडला रवाना होणार आहे.

वैभव सूर्यवंशीने(Vaibhav Suryavanshi) आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून एकूण सात सामने खेळले. त्याने एक शतक आणि एका अर्धशतकाच्या मदतीने एकूण 252 धावा केल्या. त्याने 19 एप्रिल 2025 रोजी जयपूरमध्ये लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि शार्दुल ठाकूरच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारून खाते उघडले. पदार्पणाच्या सामन्यात त्याने फक्त 20 चेंडूत 34 धावा केल्या, ज्यात दोन चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता.