राज्यात विधानसभा निवडणुकीआधी महामंडळांच वाटप करण्यात आलं आहे. या वाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चार नेत्यांच्या वाट्याला महामंडळ आली आहेत.यामध्ये सदा सरवणकर, माजी खासदार हेमंत पाटील, माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि आमदार संजय शिरसाट यांनी महामंडळपदी वर्णी लागली आहे.
तर अजित पवार गटाच्या एकाही नेत्याच्या वाट्याला महामंडळ आलेलं नाही. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर महायुतीत अतंर्गत वाद होण्याची शक्यता आहे.शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची सिडकोच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्ती पाठोपाठ हेमंत पाटील यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे.
बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र हिंगोलीच्या अध्यक्ष पदावर हेमंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आला आहे. ही स्वायत्त संस्था असून या संस्थेच्या अध्यक्षांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे माजी खासदार हेमंत पाटील यांना मंत्री पदाचा दर्जा देण्यात आला असून सर्व सोयी सुविधा मंत्री पदाच्या दर्जेनुसार मिळणार आहेत.
तसेच शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचीही अनुसूचित जाती जमातीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या आयोगाच्या अध्यक्षपदी अडसूळ यांची दीड वर्षांकरीता नेमणुक करण्यात आली आहे. तर आमदार सदा सरवणकर सिद्धिविनायक न्यासाचे ट्रस्टी आहेत. हे सर्वजण शिंदे गटाचे नेते आहेत.
त्यामध्ये भाजप वा अजित पवारांच्या एकाही नेत्याला महामंडळपदी संधी मिळाली नसल्याने जोरदार चर्चा सुरू आहे.शिंदेंच्या नेत्यांना महामंडळाचं वाटप होत असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला एकही महामंडळ आले नसल्या कारणाने याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे महामंडळाच्या वाटपावरून महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे.