महाराष्ट्र शासनाच्या वतीने सणासुदीच्या निमित्ताने १०० रुपयांत दिला जाणारा ‘आनंदाचा शिधा’ आणि वाद यांचे समीकरण झाले आहे. सामान्यांना (शिधापत्रिकाधारकांना) सण साजरा करता येण्यासाठी शिधावाटप (रेशन) दुकानांत १०० रुपयांत प्रत्येकी १ किलो रवा, चणाडाळ, साखर आणि १ लिटर खाद्यतेल उपलब्ध होते.
दिवाळीच्या निमित्ताने यामध्ये मैदा आणि पोहेसुद्धा देण्यात आले. याला ‘आनंदाचा शिधा’ असे नाव असले, तरी शिधावाटप दुकानदारांना मात्र यामुळे भयंकर डोकेदुखी झाली आहे. श्री गणेशचतुर्थीनिमित्त दिला जाणारा शिधा जसा काही भागांत अनंत चतुर्दशीपर्यंत पोचला नव्हता, तसा दिवाळीचा शिधाही अनेक ठिकाणी वेळेत पोचला नाही. अनेक भागांत तो अर्धवट स्थितीत पोचला. त्यामुळे त्यांचे संच कसे बनवायचे आणि वाटप कसे करायचे ? असे प्रश्न निर्माण झाले. काही ठिकाणी अत्यंत निकृष्ट दर्जाचे धान्य पोचले.
प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे रेशन दुकानदारांना लोकांची बोलणी ऐकावी लागत होती. चांगले धान्य लपवून ठेवून नागरिकांना निकृष्ट धान्य देणे, सरकारने धान्य पाठवले नसल्याचे सांगून आलेले धान्य काळ्या बाजारात विकणे, मापात खोट करणे यांमुळे रेशन दुकानदारांविषयी लोकांच्या मनात आधीच द्वेष असतांना या घोळाचे खापरही अनायसे त्यांच्यावरच फोडले गेले. श्री गणेशचतुर्थीनिमित्त दिलेल्या शिधाच्या पिशव्यांवर श्री गणेशाचे चित्र छापल्याने वाद निर्माण झाला होता.
ऐन गणेशोत्सवात देण्यात आलेल्या शिधाच्या पिशव्यांवर श्री गणेशाचे चित्र असल्याने ‘पिशव्यांचे पुढे करायचेकाय ?’ असा प्रश्न नागरिकांना पडला. पिशव्या फेकून दिल्यास पिशवीवरील श्री गणेशाचा अवमान होईल; म्हणून अनेकांनी त्या पिशव्या आजही घरात जपून ठेवल्या आहेत. आनंदाचा शिधामधील खाद्यतेलावर ‘हलाल प्रमाणित’ असल्याचा शिक्का !दिवाळीनिमित्त नागरिकांना देण्यात आलेल्या आनंदाचा शिधामधील खाद्यतेलावर ‘हलाल प्रमाणित’ चिन्ह असल्याची माहिती समोर आली.
भविष्यातील धोका ओळखून उत्तरप्रदेश शासनाने राज्यात हलाल प्रमाणपत्र देण्यावरही बंदी घातली आहे. आता सरकारनेच हलाल प्रमाणित तेलाच्या पिशव्या खरेदी केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. हलाल अर्थव्यवस्थेने आज केवळ भारतामध्ये ८ लाख कोटी रुपयांची समांतर अर्थव्यवस्था उभी केली आहे. सरकारही हलाल उत्पादने खरेदी करत असेल, तर जनतेने दाद तरी कुणाकडे मागायची ? तूर्तास सणांच्या वेळी दिल्या जाणार्या शिधावाटपातील त्रुटी प्रशासनाने तत्परतेने दूर करणे आवश्यक आहे.