आष्टा नगरपालिकेत माजी आमदार विलासराव शिंदे व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील गटाची मागील २५ वर्षांपासून सत्ता आहे. मात्र पालिकेत प्रशासक राज आल्यापासून शिंदे पाटील गटाच्या नगरसेवकांनी पालिकेकडे पाठ फिरवली होती.
त्यामुळे आमदार जयंत पाटील यांनी आदेश देताच माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पुन्हा पालिकेत नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी धाव घेतल्याने नगरसेवक सक्रिय झाल्याचे चित्र आहे.
आष्टा पालिकेत मागील पंचवीस वर्षांपासून आष्टा शहर विकास आघाडीची सत्ता आहे. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील यांच्यासह नगरसेवकांनी सत्ता असताना पालिकेत आपल्या कामाचा ठसा उमटवला; मात्र कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर अनेक नगरसेवकांनी पालिकेकडे पाठ फिरवली होती, त्यामुळे विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांनी पालिकेत जाऊन नागरिकांची कामे करण्यास सुरुवात केली.
पालिकेतील सत्ताधारी गटानेच स्वतःसाठी पालिकेची दारे बंद केली होती. आमदार जयंत पाटील नुकतेच आष्टा येथील पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आले असता त्यांनी नगरसेवकांनी पालिकेत जाऊन नागरिकांची कामे मार्गी लावण्याचा आदेश दिला होता. या आदेशानंतर माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील यांनी मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई यांच्याशी नागरिकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली.